भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई - एक तंगडतोड ट्रेक - ३
तंबूंच्या पाश्र्वभूमीवर चांदण्या वर येत होत्या. प्रत्येक फ्रेममध्ये त्या वर सरकत होत्या. जवळपास तासभर तीस सेकंदाची एक फ्रेम असे एकामागोमाग एक शॉट्स घेत होतो. आणि त्या प्रत्येक तीस सेकंदाच्या वेळात आजूबाजूला सावधपणे नजर टाकत होतो. कुठे डोळे चमकत नाहीयेत ना, कोणाची हालचाल तर दिसत नाहीये ना, या विचारात शेवटी साडेदहाला गाशा गुंडाळला आणि तंबूत जाऊन झोपलो. सकाळी साडेपाचला परागच्या हाकेने सगळ्यांना जाग आली. बाहेर आलो, गारठा चांगलाच वाढला होता. चंद्र कधीच मावळला होता, त्यामुळे आसमंत आणखी गडद झाले होते, आणि चांदण्यांची गर्दी दिसू लागली होती. ट्रायपॉड आणि मोबाइलला घेऊन तडक कड्याजवळ गेलो. हरिश्चंद्रगडाकडे रोखून मोबाइलला कॅमेरा लावला आणि star trail च्या settings वर पुन्हा एकदा शॉट्स घेऊ लागलो. पुढच्या फ्रेममध्ये थोडा प्रकाश दिसू लागेपर्यंत कॅमेरा चालूच ठेवला. पूर्वेकडे तांबडं फुटू लागलं तसं काळोखात फक्त बाह्यरेषा दाखवणारा हरिश्चंद्रगड नारिंगी प्रकाशात न्हाऊन निघू लागला. खाली (हरीश)चंद्र वर चांदण्या झुंजुमुंजु पहाट झाली रत्नाकर यांनी पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवत पोहे आणि चहा बनवला. पोटपूजा करू