भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई - एक तंगडतोड ट्रेक - ३
तंबूंच्या पाश्र्वभूमीवर चांदण्या वर येत होत्या. प्रत्येक फ्रेममध्ये त्या वर सरकत होत्या. जवळपास तासभर तीस सेकंदाची एक फ्रेम असे एकामागोमाग एक शॉट्स घेत होतो. आणि त्या प्रत्येक तीस सेकंदाच्या वेळात आजूबाजूला सावधपणे नजर टाकत होतो. कुठे डोळे चमकत नाहीयेत ना, कोणाची हालचाल तर दिसत नाहीये ना, या विचारात शेवटी साडेदहाला गाशा गुंडाळला आणि तंबूत जाऊन झोपलो.
सकाळी साडेपाचला परागच्या हाकेने सगळ्यांना जाग आली. बाहेर आलो, गारठा चांगलाच वाढला होता. चंद्र कधीच मावळला होता, त्यामुळे आसमंत आणखी गडद झाले होते, आणि चांदण्यांची गर्दी दिसू लागली होती. ट्रायपॉड आणि मोबाइलला घेऊन तडक कड्याजवळ गेलो. हरिश्चंद्रगडाकडे रोखून मोबाइलला कॅमेरा लावला आणि star trail च्या settings वर पुन्हा एकदा शॉट्स घेऊ लागलो. पुढच्या फ्रेममध्ये थोडा प्रकाश दिसू लागेपर्यंत कॅमेरा चालूच ठेवला. पूर्वेकडे तांबडं फुटू लागलं तसं काळोखात फक्त बाह्यरेषा दाखवणारा हरिश्चंद्रगड नारिंगी प्रकाशात न्हाऊन निघू लागला.
रत्नाकर यांनी पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवत पोहे आणि चहा बनवला. पोटपूजा करून तंबू आवरायला घेतले. जितक्या झटपट ते लागले होते, तितक्याच झटपट ते आवरले गेले. झऱ्याच्या ठिकाणी जाऊन पाण्याच्या बाटल्या आणि कॅन भरून घेतले. तिथून परतताना बाजूच्या झाडीत काहीतरी हलल्याचा आवाज झाला. एखादा रानकोंबडा किंवा तत्सम पक्षी असावा अशी समजूत करून परत जागेवर आलो. गवळदेवाचा निरोप घेतला आणि अचूक नऊच्या ठोक्याला मूडा डोंगराकडे मोर्चा वळवला.
दोन्ही डोंगरांच्या मधल्या भागात थोडी झाडी लागली आणि त्याच भागातल्या पायवाटेवर उमटले दिसले काही जनावरांच्या पायाचे ठसे. ते बिबट्याचे वाटावेत इतपत सारखे आणि ताजे होते. याखेरीज रानडुकराच्या पायाचे ठसेदेखील रत्नाकर यांनी ताडले. त्यामुळे पुढचा काही वेळ आम्ही खाली बघूनच चालत होतो, हे माहित करायला कि ते ठसे जातात कुठे. अर्थात असा कोणी प्राणी जवळपास असलाच तर त्याने आम्हाला आधीच पहिले असणार, त्यामुळे तो काही समोर येणार नाही. तरीही आम्ही मात्र तेच ठसे बघून चालत होतो. पुढच्या काही अंतरानंतर ते दिसेनासे झाले, आम्हाला हे कळू न देता कि ते कुठे गेले. त्या ठशांमध्ये नखांच्या खुणा होत्या, त्यावरून ते कुत्र्याच्या जातीतल्या एखाद्या प्राण्याचे असावेत असे घरी आल्यावर काही जाणकारांकडून कळले.
पंजाचे ठसे
आता ते ठसे आपल्या मार्गावर नाहीत हा सुटकेचा निश्वास सोडून आम्ही पुढे निघालो. मुडा डोंगर आणि नंतर कात्राबाईपर्यंतची वाट ठळक आणि फार चढ नसलेली होती. अधेमध्ये गर्द झाडीचे पट्टे आणि त्यात पायवाट शिरलेली. असे वाटत होते, कि एखाद्या गुहेत प्रवेश करतोय. दोन्ही बाजूंनी झाडांचे आच्छादन, त्यामुळे हिरवीगार सावली होती. इथून आम्हाला मागे गवळदेवपासून पाबरगडापर्यंतची डोंगररांग दिसत होती तर समोर कात्राबाई, करांडा आणि आजोबा डोंगरांची टोके दिसत होती.
आमची चाल बऱ्यापैकी होती, त्यामुळे तासाभरातच आम्ही कात्राबाईच्या खिंडीत पोचलो. खरंतर कात्राबाई आमच्या प्लॅनमध्ये नव्हतंच, मुड्यापर्यंत येऊन कुमशेतला उतरायचं असं ठरलं होतं. पण आमच्या वेगाने आता आम्ही कात्राबाई आणि वाटेत जेवूनसुद्धा दुपार टळायच्या आधीच खाली उतरू शकणार होतो. खिंडीत बॅगा ठेवून आणि अमृतला थांबवून आम्ही माथ्याकडे निघालो. कात्राबाईच्या वरच्या टप्प्यातल्या पठाराकडे घेऊन जाणारी वाट घसरणीची होती. या पठारावर आम्हाला आणखी एक ट्रेकर्सचा ग्रुप भेटला. त्या लोकांनी रात्र इथेच वर काढली होती आणि आता ते गवळदेवकडे निघाले होते. त्यांची चौकशी करून माथ्याकडे वळलो. पुढची पूर्ण वाट सुकलेल्या कारवीतून जात होती. या कारवीत मोठेमोठे फुलपाखरांचे कोष लागलेले दिसले. तो पट्टा कापत आम्ही माथा गाठला आणि रतनगडाच्या थेट समोर असलेल्या टोकावर जाऊन पोचलो.
उजवीकडे पाबरगडापर्यंतची रांग आणि डावीकडे करंडा आणि आजोबाचे ताशीव कडे केवळ अफलातून दिसत होते. सह्याद्रीचं ते अफाट दृष्य डोळ्यात साठवून आम्ही घळीकडे निघालो. सह्याद्रीमधली सर्वात उंच असलेली कात्राबाईची घळ आमच्यासमोर आवासून उभी होती. समोर रतनगडाचे पाषाणरूप लक्ष वेधून घेत होते. नजर हटत नव्हती. सह्याद्रीचे हे राकट सौंदर्य तिथेच बसून केवळ बघत राहावं असंच वाटत होतं. त्या घळीच्या सुरुवातीच्या खडकांवर उतरून त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न म्हणजे पक्वान्नांनी भरलेल्या ताटातून फक्त लोणच्याचे एखादे बोट चाखण्यासारखाच प्रकार होता. कधीतरी इथून उतरण्याचे मनसुबे रचून आम्ही मागे वळलो.
खिंडीत येऊन आम्ही पाण्याचा एक विसावा घेतला. बॅगा पाठीवर टाकल्या आणि कुमशेतच्या उताराला लागलो. या वाटेचा बराचसा टप्पा दाट झाडीच्या सावलीचा होता, त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हताच. दुपारी दीड वाजता आम्ही एका बेचक्यातल्या सुकत आलेल्या ओढ्याजवळ जेवणासाठी थांबलो. मोठ्या कातळातली सावलीची आणि पाणी असणारी ती जागा खूपच सुखावून गेली. सगळ्यांना वाटून दिलेली थेपल्यांची पाकिटे आता बाहेर पडली. सोबतीला सॉस, चटणी, लोणची आणि कांदा होतेच. जेवणानंतर आलेली चहाची तलफ भागवण्यासाठी रत्नाकर यांनी पुन्हा एकदा कंबर कसली. तर अमितने त्याच चुलीत बटाटे भाजून बार्बेक्यूचा आनंद घेतला.
पुढच्या अर्ध्या तासातच आम्ही गावातल्या विहिरीपाशी येऊन पोचलो. इथे आम्हाला इंग्रजांच्या काळातला एक मैलाचा दगड दिसला. तसा आणखी एक कात्राबाईच्या डोंगरावर जातानाही दिसतो. मागच्या ट्रेकला तो दिसला होता, बहुदा यावेळी चुकामुक झाली. वस्तीच्या दिशेने कच्च्या रस्त्यावरून चालत सुटलो. मागे वळून पाहिले, एका मोठ्या कॅनव्हासवर डावीकडे आजोबा आणि उजवीकडे करंडा यांच्यामध्ये गुहिरीचे दार आम्हाला खुणावत होते.
फोटो ची गोष्ट..मस्त👍🏻
ReplyDeleteधन्यवाद प्रशांत!
Delete