रौद्रभीषण भीमाशंकर
२००९ च्या जुलैमधली एका शुक्रवारची संध्याकाळ! योगेश, अधिक, ललित, प्रशांत आणि मी जमलो होतो. खल चालला होता उद्या कुठे भटकंती करायची यावर. तसं मागचा ट्रेक (रायगड) करून ४-५ वर्षं झाली होती. त्यानंतर कुठेच फिरणं झालं नव्हतं. त्यामुळे मोठ्या हिरिरीने चर्चा चालली होती. तेव्हा आमच्यात फक्त ललितकडे कॉम्प्युटर, त्यामुळे त्याच्या घरी बसून इंटरनेटवर खूप शोधाशोध झाली, आणि ठरलं - भीमाशंकर! खरंतर भीमाशंकर हा गणेशघाटाने खूप सोपा तर शिडीघाटाने त्यावेळी खूप अवघड ट्रेक होता. आणि तरीही आम्ही तोच निवडला होता, काहीतरी थ्रिलिंग करायचं होतं आम्हाला.
सकाळी लवकर निघून आम्ही वेळेत खांडसला पोचलो. आता सुरु झाली गावातल्या लोकांकडे चौकशी. त्यांनीही सांगायला सुरुवात केली, शिडीघाटाच्या वाटेने लवकर जाऊ शकाल पण अवघड आहे, अपघात होऊ शकतो, तर गणेशघाट सोपा आहे पण ५-६ तास लागतील. पण आम्हाला आज कुछ तुफानी करायचं होतं. त्यामुळेच तर हा ट्रेक ठरला होता. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. प्रशांतचा निर्णय झाला होता, शिडीघाट! खूप खल झाला आणि शिडीघाट बहुमतांनी जिंकला. मात्र रस्ता कोणालाच माहीत नव्हता.
आमच्याच उंचीचा दगड आमच्यासमोर उभा होता जो चढून आम्हाला शिडीजवळ पोचता येणार होते. बेचक्यातून एकमेकांना आधार देऊन आम्ही तो चढण्याचा खटाटोप केला आणि चढलो खरे, पण नंतर कळले की बाजूने वळसा घालून सहजपणे येता आले असते. कपाळाला हात लावून आम्ही पुढे झालो. एका मोठ्या उभ्या कातळाच्या खाचेमध्ये एक लोखंडी शिडी पाय रोवून उभी होती. शिडीचे वरचे टोक दुसऱ्या कातळावर विसावलेले. ती चढताना आधार म्हणून एक बांबू त्याच्या बाजूला ठेवलेला. इथून चढायला सुरुवात कोणी करायची या विचारात असतानाच एक ट्रेकिंग ग्रुप समोरून ती शिडी उतरायला आला. त्यातला पहिला गडी उतरताना शिडी हलू लागली आणि पाचावर धारण बसणे किंवा आताच्या काळात हातभार फाटणे या वाक्प्रचाराचा अनुभव आला.
आम्ही त्यांना विचारणा केली. आमच्या शरीराकडे बघून एक जण म्हणाला, "फार कठीण नाही, करू शकाल तुम्ही. मोक्याच्या जागी शिड्या आहेत. बाकी काही पॅच आहेत ते नीट जा." तेव्हा हायसे वाटले. तो ग्रुप पूर्ण उतरून गेल्यानंतर आम्ही पहिली शिडी चढायचा यशस्वी प्रयत्न केला. आयुष्यातल्या दुसऱ्याच ट्रेकमध्ये असे काही करावे लागेल असे वाटले नव्हते. आता हे तर पार केले पण त्यापुढे आणखी एक दिव्य होते. एक भला मोठा कातळ जवळपास ८५ अंशाच्या कोनात उभा होता. कातळ कसला उभ्या कड्याचाच भाग तो. आणि त्यावरच्या खाचा आणि खोबण्यातून हात पाय रोवून आडवे जायचे होते. आम्ही संयम ठेवून होतो. एकेक करत हळूहळू तो टप्पा पण पार केला. जीव भांड्यात पडला.
आतापर्यंत थंड असलेल्या पावसाला पण मूड आला. त्यात डोंगरदऱ्यातला पाऊस म्हणजे धुवांधार. गळ्यात असलेला कॅमेरा बॅगेत गेला. तेव्हा ऍडव्हान्स मोबाईल नव्हते. एकुलता एक कॉम्पॅक्ट कॅमेरा बॅगेत गेल्यामुळे ट्रेकचे फारसे फोटो निघाले नाहीत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आम्ही शिडीघाट चढून पदरवाडीला पोचलो. परत सगळ्यांना भूक लागली होती. ही भूक भलामोठा कातळकडा पार करताना पोटात आलेल्या गोळ्यामुळे असावी. पण आता माझ्याखेरीज कोणाकडे खायला काहीही नव्हते. घेतलेली केळी आधीच संपली होती. आली का पंचाईत! माझ्याकडे एक मोठा डबा भरून मेथीच्या कडक पुऱ्या होत्या. डबा उघडला आणि त्या संपल्या कधी काही पत्ता लागला नाही.
अजून बऱ्यापैकी जंगलवाट पार करायची होती. वाट चढणीची होती पण जंगलातली होती. आता कातळटप्पा नव्हता. झपाझप पावले टाकत होतो. पाऊस अधूनमधून आमची परीक्षा घेत होता. गडद धुक्यामुळे जंगल अगदी रहस्यमय झालं होतं. एका टप्प्यावर उघडी कुरणांतली पायवाट, डाव्या बाजूला खोल, तर उजव्या बाजूला उभा डोंगर. चालत असतानाच उजवीकडे वळून आम्ही दगडांची खडी अरुंद वाट धरली. योगेश सर्वात पुढे, पायातल्या कीटोज काढून वर फेकायचा आणि अनवाणी पायाने वाट चढत होता. आम्ही पन्नास-एक पावले वर गेलो असू, जोरदार पाऊस सुरु झाला. आम्हाला कळलं कि ही वाट चढाईची नसून पाण्याची आहे. मग काय! उलट प्रवास सुरु, सगळ्यांची खाली उतरण्याची धडपड. अगदी आरडाओरडा करत आम्ही खाली उतरत होतो. त्यात आता योगेशने कीटोज अशा जागी फेकलेल्या कि हात पोचत नव्हता. मग तारांबळ! कशीबशी ती चप्पल हाती लागली आणि आम्ही पुन्हा पहिल्या पायवाटेवर पोचलो. उजवीकडे बघतो तर कुरणांतली पायवाट सरळ जात होती.
दवडलेला वेळ बघता आम्ही जोरकसपणे आगेकूच चालू ठेवली होती. समोर थोड्या अंतरावर असणाऱ्या एका वळणावर एक कुत्रं आपली झलक दाखवून गेलं. माणसांच्या प्रदेशात आलो असू हा विचाराने थोडे हायसे वाटले, पण कसले काय! पुढे कोणीच दिसेना. कुरणांचा टप्पा जाऊन पुन्हा एक गडद जंगल लागलं. दिवस मावळतीला चालला होता. घनदाट जंगल, संध्याकाळची वेळ आणि धुक्याने वेढलेलं वातावरण यांनी एखाद्या भयपटाचा देखावा उभा केला होता. त्यात ते कुत्रं पण गायब झालं होतं. आमचा वेग दुपटीनं वाढला. माथ्यावर पोचत नाही तोपर्यंत थांबणं आम्हाला भीतीदायक वाटत होतं. शेवटची पाण्याची वाट पार करून आम्ही मोकळ्या पठारावर पोचलो आणि एकाच सुस्कार निघाला. हुर्रे! आम्ही पोचलो होतो.
संध्याकाळची वेळ आणि आभाळ भरलेलं असल्याने अंधार व्हायला सुरुवात झाली. आम्ही तडक एक हॉटेल गाठलं आणि पोटाला अराम दिला. हॉटेलमधल्या आजींनी गरमागरम पिठलं-भाकरी कांदा आणि चटणी खाऊ घातली आणि आमचे दिवसभराचे श्रम निवले. राहायच्या जागेची व्यवस्था कुठे होते का ते शोधायला लागलो. जागा तर मिळाली, पण झोप उडवणारी. वरून छपराला लागून आणि पलंगाखालून उंदरांनी उच्छाद मांडला होता. सगळे दमले असल्याने उशिरा कधीतरी झोप लागली. सकाळी गॅलरीत येऊन बघतो तर मंदिराचा कळस दिसत होता. रिमझिम पाऊस आणि धुक्याचं वातावरण. मंदिर परिसरात फार गर्दी दिसत नव्हती. पटापट आवरून आम्ही मंदिरात गेलो. अतिशय सुंदर वातावरण होतं. कालपासून बॅगेत असलेला कॅमेरा बाहेर आला आणि मंदिराच्या मागच्या बाजूला एक ग्रुप फोटो क्लिक करून आम्ही पुन्हा एकदा 'पोटोबा' करायला स्टॉल्सचा रास्ता धरला. गुप्त भीमाशंकरबद्दल आम्हाला तेव्हा फार माहिती नव्हती. त्यामुळे तिकडे पावले वळलीच नाहीत. घरीसुद्धा वेळेत पोचायचं होतं.
पुन्हा एकदा जंगलाकडे मोर्चा वळवला. आता गणेशघाटाने उतरायचं आहे हे आधीच ठरलं होतं. कालची शिडीघाटाची वाट रौद्रभीषण तर आता गणेशघाटाची वाट शांत सुंदर उल्हसित करणारी होती. जंगलातून जाणारी पायवाट आणि मध्येच लागणारे ओढे बघून कालचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. त्या निसर्गाचा आनंद लुटत आम्ही येऊन पोचलो गणेश मंदिराजवळ. तेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू होतं. गणपतीला नमन करून आणि आम्ही सहीसलामत खाली पोचल्याबद्दल त्याचे आभार मानून गावात पोचलो. आता आम्हाला थेट नेरळला घेऊन जाणारी रिक्षा मिळाली होती. नेरळ स्टेशनात मिनीट्रेनमध्ये परत एकदा फोटोबाजी केली आणि घरचा रस्ता धरला.
या ट्रेकची आम्हाला फारच संकुचित माहिती होती. याखेरीज चढताना आणि उतरताना दुसरा कोणताही ट्रेकर ग्रुप आमच्यासोबत नव्हता. चढताना पहिल्या शिडीपाशी भेटलेला एक ग्रुप आणि गावकऱ्यांकडची माहिती यावरच आम्ही अवलंबून होतो. पण ट्रेक पूर्ण करण्याची जिद्द आणि परस्पर सहकार्य यामुळेच आम्ही हा ट्रेक पूर्ण करू शकलो. त्यामुळे त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
Comments
Post a Comment