भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई - एक तंगडतोड ट्रेक - १
काही वर्षांपूर्वी भंडारदरा lakeside camping केलं होतं. तेव्हा त्याच्या आजूबाजूचे डोंगर म्हणून घनचक्कर, गवळदेव यांची नावं कळली होती. कुतूहल होतंच, पण कल्पना नव्हती की या डोंगरांवरसुद्धा ट्रेकिंग होत असेल. अगदी हल्लीहल्ली सोशल मिडिया मुळे इथल्या ट्रेकिंगच्या वार्ता कळत होत्या. तरीही ते किती कठीण असेल, रॉकपॅच असतील का हे प्रश्न होतेच. जसं जास्त कळत गेलं तशी ओढ आणखी वाढू लागली होती. पण योग काही येत नव्हता. नाही म्हणायला, मागे एकदा फक्त कात्राबाईचा ट्रेक केला होता. तरी या संपूर्ण रांगेचं आकर्षण होतंच. बहुदा हा रेंज ट्रेक व्हायचा योग होता, म्हणून बाकीचे प्लॅन रद्द होत होते. म्हणून जेव्हा परागने शिरपुंजेचा भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा अशा रेंज ट्रेकची बातमी दिली तेव्हा दुसऱ्याच दिवशी होकार कळवून टाकला.
रेंज ट्रेक असल्याने लागणारं सामान परागने कळवलं. नेहमीचे कपडे, पाणी, टॉर्च सोडता टेंट आणि जेवणाची भांडी घ्यायची होती. खरंतर मोठी बॅग नसल्याने मी ट्रेकमधला कच्चा लिंबूच होतो, आपलं नेहमीचंच सामान नेणारा. पराग, रत्नाकर, अनुप, अमित, परेश, आणि मी असे ट्रेकचे सहा गडी होतो. त्यात पराग, अनुप आणि रत्नाकर पक्के मुरलेले ट्रेकर्स. त्यांना रात्री कसाऱ्याच्या ट्रेनमध्ये भेटलो तेव्हा मी किती कच्चा आहे ते आणखी कळून चुकलं. त्यांच्या बॅगा बघून माझी तर छातीच दडपून गेली होती. तरीही त्यांना थोडी मदत म्हणून बॅगमध्ये थोडी रिकामी जागा ठेवली होती, रत्नाकर यांनी बऱ्यापैकी शिधा आणला होता, तो वाटून घ्यायला. अनुपचं नाव ऐकलं होतं, पण भेट झाली नव्हती. ती या ट्रेकच्या निमित्ताने झाली.
२७ जानेवारीच्या रात्री कसाऱ्याला सव्वा वाजता पोचलो आणि आमचा प्रवास सुरू झाला तो शिरपुंजेच्या दिशेने. पहाटे पावणे पाचला शिरपुंजेच्या हनुमान मंदिराजवळ गाडी लागली. बाहेर पडलो आणि थंडीने घेरलं. रात्रीच्या थंडीपेक्षा पहाटेची थंडी नेहमीच बोचणारी! पण त्या हनुमान मंदिरात अंग टाकलं ते थेट सात वाजता परागच्या हाकेने जाग आली. खरंतर नेहमीप्रमाणे एखाद्या किल्ल्याचा ट्रेक असता तर अजून टंगळमंगळ झाली असती, पण यावेळी असं झालं नाही. आपल्या स्लीपिंग बॅग, चादरी आवरून सगळे बाहेर आले, शिधा वाटून घेतला. खरंतर परागच्या मते रत्नाकर यांनी फारच शिधा आणला होता, पण त्यामागे त्यांची नंतर काही पंचाईत होऊ नये ही भावना ओळखून आम्ही तो जमेल तसा वाटून घेतला. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत ट्रेकचा श्रीगणेशा केला, तेव्हा घड्याळात सकाळचे साडेसात वाजले होते.
पुढच्या काही मिनिटांतच आम्ही भैरवगडाच्या पायऱ्यांपाशी होतो. तिथे दोन गोलाकार शेड्स आहेत आणि ट्रेकर्स तिथे रात्रीची विश्रांती घेऊ शकतात. अगदी चारचाकी गाडीसुद्धा तिथपर्यंत पोचते. वेळ न दवडताच आम्ही चढाई सुरू केली. काही मिनिटांतच बांधलेल्या पायऱ्या संपून दगडातल्या खोदीव पायऱ्या सुरू झाल्या. काही ठिकाणी तर त्यासुद्धा नव्हत्या, नुसतीच मातीची वाट. पण तो खडा चढ चढताना धाप लागायला लागली. त्यात सकाळी काही न खाताच ट्रेक सुरू केला होता. या रेंज ट्रेकला येऊन चूक तर केली नाही ना, पुढचा संपूर्ण ट्रेक झेपेल ना अशा प्रश्नाचं काहूर माजलं. पण खिंडीत पोचलो आणि सगळा शीण गेला. डाव्या बाजूला भैरवगडावर जाणारी शिडी आणि उजव्या बाजूला घनचक्करकडे जाणारी शिडी लावलेली होती. आणि त्या खिंडीतून पलीकडचं जे दृश्य दिसत होतं ते केवळ अफलातून होतं. कुंजरगड, कोथळेचा भैरवगड, हरिशचंद्रगडाची तारामती आणि बालेकिल्ला ही शिखरं, रोहिदास शिखर, माळशेज अशा एकामागोमाग एक फिक्कट होत जाणाऱ्या डोंगररांगा लख्ख सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या क्षितिजावर कॉन्ट्रास्ट उभा करत होत्या.
एक छोटा विसावा घेऊन भैरवगडाचा माथा गाठायला सुरुवात केली. शिडी असल्याने तो केवळ दोन मिनिटे दूर होता. वर जाऊन एका मोठ्या कातळावर ठिय्या मांडला. इथे वर आल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजूला कातळात खोदलेलं पाण्याचं मोठं टाकं पाहायला मिळतं. यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. आळस झटकून चौफेर दिसणाऱ्या सह्याद्रीवर एक नजर टाकली आणि नाश्त्याच्या तयारीला लागलो. पोटात काही नसल्याने आधी पोटोबा मग विठोबा अशीच आमची गत होती. आमच्या आधी एक वीस जणांची टीम आधीच वर पोचून पोहे, खिचडी आणि चहाच्या तयारीला लागली होती. अशी स्वतःची सोय स्वतःच करणाऱ्या ट्रेकर्स लोकांची भट्टी कुठेही जमून जाते. त्यामुळेच आम्हालाही आमचं काहीही सामान बाहेर न काढता चहा मिळून गेला. ब्रेड, चीज आणि सॉस यांची गट्टी जमवून आम्ही त्यावर ताव मारला आणि चहा घेतल्यावर आणखी तरतरी आली.
मग भैरवनाथाच्या गुहेकडे वळलो. दोन प्रवेशद्वारांतून गुहेत जाता येतं. माणसाच्या उंचीच्या छोटेखानी गुहेत भैरवनाथाची अश्वारुढ मूर्ती आहे. खाली कातळावर सारिपाटाच्या खेळासारखे चौकोन कोरलेले आहेत. डाव्या बाजूच्या भिंतीलगत काही नंदी ठेवलेले दिसतात. गुहेच्या बाहेर एक वीरगळ आहे ज्याच्या चारही बाजूला कोरीवकाम आहे. गणपती तसेच आणखी एका देवतेची कातळातली मूर्ती देखील इथे दिसते. गडावर पाण्याची बरीच टाकी पाहायला मिळतात. रेलिंग्जच्या बाजूने वर सांगितलेला खिंडीतून दिसणारा विस्तृत नजारा पाहायला मिळतो. जितकं बघावं तितकं कमीच.
हे सर्व बघून आम्ही पुन्हा एकदा शिडीकडे वळलो. आता भैरवगडाची शिडी उतरून घनचक्करवर जाणारी शिडी चढायची होती. ती शिडी असलेला भाग भैरवगडापेक्षा थोड्या उंचीवर असल्याने चढून वर गेल्यावर संपूर्ण भैरवगड एका दृष्टिक्षेपात येतो. तर उजव्या बाजूच्या सह्याद्रीच्या दृश्यात आणखी भर पडते ती मुळा नदीच्या खोऱ्याची. कुमशेत, शिरपुंजे खुर्द, आंबित, पाचनई या गावांच्या कडेने वाहणाऱ्या मुळेची नागमोडी वळणे वरून मोहक दिसतात. हे दृष्य पाठीमागे ठेवून आम्ही घनचक्करच्या दिशेने मोर्चा वळवला. सुरुवातीची वाट अगदीच ठळक, दोन्ही बाजूंनी सुकलेल्या कारवीने वेढलेली होती. खरंतर या मॉन्सूननंतर रतनगडावर गर्दी करण्यापेक्षा इकडे आणखी आल्हाददायक वाटले असते, असो. हलकी चढत जाणारी, बराच काळ कारवीतून जाणारी वाट नंतर हिरव्या झाडीत शिरली आणि संभ्रम निर्माण झाला. याच झाडीत छान सावली बघून पाण्यासाठी पहिला थांबा घेतला. घड्याळात साडेदहा वाजले होते.
आमचे गाईड अमृत वाटा शोधण्यात तरबेज. अचूक वाट शोधून झाडीचा छोटा टप्पा मागे टाकला आणि आता फक्त मोकळं माळरान आमच्यासमोर होतं. या माळरानाच्या सुरुवातीला आम्हाला एका ठिकाणी एक घंटा एका लोखंडी खांबाला अडकवलेली पाहायला मिळाली. भोवती छोट्यामोठ्या दगडांची गर्दी होती. एखादं स्थानिक देवस्थान असावं. एका ठिकाणी वाटेवरच्या कातळावर काही नावे आणि डिसेंबर १९७० अशी तारीख कोरून ठेवलेली दिसली. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही एका टेकडाच्या पायथ्याशी पोचलो. ते टेकाड म्हणजे घनचक्करचं टोक होतं. एका भल्यामोठ्या दगडाच्या आडोशाला पुन्हा एक विसावा घेतला. बॅगा तिथेच ठेवून टेकाड सर करायला घेतलं. पुढच्या दहाव्या मिनिटाला घनचक्करचा माथा आम्हाला निसर्गाची दौलत खुली करून देत होता. उजव्या बाजूच्या पाबरगडापासून डाव्या बाजूच्या कात्राबाईपर्यंतचं दृष्य कोणत्याही वाईड लेन्सच्या टप्प्यात येणारं नव्हतं. कात्राबाई, रतनगड, खुट्टा सुळका, कुलंग, मदन, अलंग, कटीरा, किरडा, बैलघाट्या, सकीरा, कळसुबाई, भंडारदऱ्याचा जलाशय, पाबरगड अशी न संपणारी यादी डोळ्यांपुढे उभी होती.
हे सगळं डोळ्यांत साठवून खाली आलो, बॅगा पाठीवर टाकल्या आणि पुन्हा एकदा ठळक पायवाट धरली. घनचक्करच्या आणखी एक टेकडाला छोट्या चढणीवरून वळसा घातला आणि पुढे निघालो. आता समोर गवळदेवचं टोक दिसत होतं. मागे घनचक्कर आणि पुढे गवळदेव! आणि दुरून हरिश्चंद्र पूर्ण वाटचालीत आमच्यावर नजर ठेवून! 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। माझ्याकडे देव माझा पाहतो आहे।।' अशी अवस्था होती ती!
Comments
Post a Comment