भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा-कात्राबाई - एक तंगडतोड ट्रेक - २
कात्राबाई, रतनगड, खुट्टा सुळका, कुलंग, मदन, अलंग, कटीरा, किरडा, बैलघाट्या, सकीरा, कळसुबाई, भंडारदऱ्याचा जलाशय, पाबरगड अशी न संपणारी यादी डोळ्यांपुढे उभी होती. हे सगळं डोळ्यांत साठवून खाली आलो, बॅगा पाठीवर टाकल्या आणि पुन्हा एकदा ठळक पायवाट धरली. घनचक्करच्या आणखी एक टेकडाला छोट्या चढणीवरून वळसा घातला आणि पुढे निघालो. आता समोर गवळदेवचं टोक दिसत होतं. मागे घनचक्कर आणि पुढे गवळदेव! आणि दुरून हरिश्चंद्र पूर्ण वाटचालीत आमच्यावर नजर ठेवून! 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। माझ्याकडे देव माझा पाहतो आहे।।' अशी अवस्था होती ती!
सूर्य डोक्यावर आला होताच. त्यामुळे आता चांगली सावलीची जागा बघून जेवणासाठी ठिय्या मांडायचा होता. घनचक्करच्या सोंडेला वळसा घालून आम्ही पुन्हा एकदा उताराला लागलो होतो. हा उतार होता घनचक्कर आणि गवळदेवच्या मधल्या घळीतला. मोकळं रान असल्याने वातावरण तापलं होतं. उतारावर एका ठिकाणी काही झाडे दिसली आणि तिकडेच जेवणाचा पडाव टाकला. रत्नाकर यांनी आणलेल्या पेटाऱ्यातून भाकऱ्यांचा जिन्नस निघाला. तांदळाच्या भाकऱ्या, खोबरे-लसूण-शेंगदाण्याच्या चटण्या, कांदा, लोणचे यांच्या भरीस गाईड अमृतने घरून आणलेली वालाची भाजी आणि चपात्या यांची भर होती. जेवण तब्येतीत पार पडलं. पण फार थांबून चालणार नव्हतं, कारण मोठा पल्ला गाठायचा होता. १०-१५ मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा बॅगा पाठीवर टाकल्या आणि घळीच्या उताराला आपलंसं केलं. घड्याळात दीड वाजला होता.
आता पाण्याची सोय बघायची होती. अमृतच्या अंदाजाने जिथे पाणी सापडलं असतं, तिथलंच पाणी संपल्याचं कळलं आणि आमच्या तोंडचं पाणी पळालं. कारण पाण्याशिवाय आम्हाला जेवण बनवता येणार नव्हतं कि थांबताही येणार नव्हतं. गवळदेवला निरोप देऊन आम्हाला मुड्यावरून खाली कुमशेतला उतरावं लागलं असतं. आम्ही गवळदेवच्या वरून दुसऱ्या टप्प्याच्या पठारावर होतो आणि अमृतने खाली तिसऱ्या टप्प्याच्या पठाराकडे बोट दाखवत तिकडे पाणी असण्याची शक्यता सांगितली. खात्री करून घेण्यासाठी अमृत आणि त्या दुसऱ्या टीमचे गाईड खाली गेले. पाणी सापडल्याची आनंदवार्ता होतीच, पण आता मुक्काम त्या ठिकाणी हलवावा लागणार होता. कारण तिथून पाणी घेऊन येणे म्हणजे एक छोटा ट्रेकच होता. काही ईलाज नव्हता. पुन्हा एकदा उताराला लागलो. ५ मिनिटेही चाललो नसू, कि पायवाटेच्या बाजूलाच एक नैसर्गिक झरा दिसला. चाचपणी केली, पाणी इतके स्वच्छ आणि गार, कि आम्ही तिथेच मनसोक्त पाणी पिऊन घेतले आणि शीण घालवला. पाणी आणि जीव भांड्यात पडले एकदाचे.
पाणी भरून वर आलो. परागने आधीच तंबू ठोकायची जागा शोधून ठेवली होती. माणसे सात आणि तंबू तीन, त्यामुळे कोणतीही काटकसर न करता तिन्ही तंबू लावून आम्ही मोकळे झालो. मुक्काम नक्की झाल्याने आता चहाची तलफ वाढू लागली होती. पिट्टूमधून चहाचे जिन्नस बाहेर आले. परागने स्टोव्हचे इतिकर्तव्य पार पडले आणि आमचा उदर भरणाचा यज्ञ सुरु झाला. रत्नाकर यांनी फक्कड चहा बनवून या यज्ञाची नांदी केली. चहा ढोसून आम्ही गवळदेव माथ्याकडे निघालो. पराग आणि परेश तंबूजवळच थांबले. आम्ही निघालो खरे, पण रेताड घसरणीने आमची पुरती भंबेरी उडवली होती. त्यात एक छोटा कातळटप्पा! कातळटप्पा म्हटले कि कमी उंचीमुळे आधी माझे धाबे दणाणतात. येताना काय हालत होईल याचा विचार करतच आम्ही वर चढत होतो.
शिखरावरच्या एका कातळावर गवळदेवाचं देवस्थान आहे. तांदळा आणि एक पिंड आपल्याला इथे पाहायला मिळते. नुसत्याच दगडांनी रचलेल्या या मंदिरावर बऱ्याच घंटा दिसतात. वर पोचलो तेव्हा सूर्य मात्र मावळतीकडे कलत होता. अवघा आसमंत सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाला होता. भोवतालची गिरिशिखरे सोनेरी किरणांची दागिने ल्याली होती. पुन्हा एकदा चोहोबाजूने 'राकट देशा'चं दर्शन झालं. त्या परिसरातल्या सर्वोच्च शिखरावर आम्ही उभे होतो, आभाळ ठेंगणे होणे याचा प्रत्यय घेत!
उतरताना धाकधूक होतीच की घसरण कशी पार पाडायची. दबकतच खाली उतरत होतो. पुन्हा एकदा मावळत्या दिनकराने उधळलेले रंग बघताना त्या लाल बिंबाकडे पाहत बसायचं की उतरायचं हा संभ्रम निर्माण झाला. वरून त्या डोंगरदऱ्यांमध्ये ठिपक्याएवढे दिसणारे आमचे तंबू माणूस निसर्गाच्या तुलनेत किती क्षुल्लक आहे याची जाणीव करून देत होते. थोड्याच वेळात तंबू गाठले. खाली परागने बनवलेलं गरमागरम सूप आमची वाट बघत होतं. ते ओरपून झापेच्या कड्यापाशी आलो. संधीप्रकाशात दिसणाऱ्या हरिश्चंद्रगड, कलाडगड, नाफ्ता या डोंगरांच्या कडांना न्याहाळत बसलो. हरवूनच जायला झालं होतं त्या वातावरणात. भूत-भविष्याचा कसलाही लवलेश मनात नव्हता. निसर्गाचं संमोहनच होतं ते.
मागे मुगाच्या खिचडीची तयारी सुरू झाली. Swiss knife हवा होता म्हणून मला हाक आली आणि तंद्री भंगली. खिचडीला लागणारा जिन्नस प्रत्येकाने आपल्या परीने तयार करून दिला. फोडणी पडली, कांदा-बटाटा-गाजर-टोमॅटो यांची यज्ञात आहुती गेली, त्यांच्या स्वादाला मसाल्यांनी उडी घेतली! एक खमंग वास आमची भूक चाळवून गेला. तांदूळ आणि डाळ अंघोळ करून टोपात गेले आणि रत्नाकर यांची जादूची कांडी टोपात फिरली. रत्नाकर एक कुशल स्वयंपाकी! टोपात अगदी अचूक पाणी घालून त्यांनी झाकण लावलं, आणि ते उघडलं तेव्हा वाफाळती पिवळीधम्मक खिचडी तयार! त्याच्या जोडीला मग परागनेही पापड भाजून घेतले. वातावरणात वाढणारा गारठा आणि दिवसभराची पायपीट आमचा जठराग्नी वाढवत होते. म्हणूनच मग जास्त वेळ न दवडता थाळ्या बाहेर काढल्या! खिचडी, पापड, सकाळच्या चटण्या, लोणचे, कांदा, लिंबू यांनी सजलेली थाळी म्हणजे आमच्यासाठी पक्वान्नांचं ताट होतं. 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।' म्हणत आम्हीही हात आखडता घेतला नाही.
आता पाणी संपलं होतं, त्यामुळे अमृतसोबत पाणी आणायला एक फेरी मारली. या फेरीदरम्यान गप्पा मारताना कळलं की इकडे जंगली श्वापदांचा वावर आहे. भीतीने अंगात एक शिरशिरी आली. येताना पुरता सावध होऊनच चालत होतो. शेकोटीपाशी थोड्या गप्पा झाल्या आणि प्रत्येकजण तंबूत जाऊन झोपला. मी मात्र बाहेरच होतो. Star trail शूट करायची हीच तर संधी होती. चंद्र पश्चिमेला कलला होता आणि मी पूर्वेला तंबूच्या दिशेने कॅमेरा रोखला होता. तंबूंच्या पाश्र्वभूमीवर चांदण्या वर येत होत्या. प्रत्येक फ्रेममध्ये त्या वर सरकत होत्या. जवळपास तासभर तीस सेकंदाची एक फ्रेम असे एकामागोमाग एक शॉट्स घेत होतो. आणि त्या प्रत्येक तीस सेकंदाच्या वेळात आजूबाजूला सावधपणे नजर टाकत होतो. कुठे डोळे चमकत नाहीयेत ना, कोणाची हालचाल तर दिसत नाहीये ना, या विचारात शेवटी साडेदहाला गाशा गुंडाळला आणि तंबूत जाऊन झोपलो.
Comments
Post a Comment