चोंढे घाट ट्रेक

जसजसे आम्ही डेहणेच्या जवळ पोचत होतो, तसतसा आजोबाचा डोंगर अजस्त्र भासत होता. पाटेकरांच्या अंगणात बसून आमच्या ट्रेकबद्दलच्या गप्पा रंगल्या. पराग आणि रत्नाकर फारच अनुभवी ट्रेकर. त्यांचे किस्से ऐकण्यात गंमत वाटत होतीच. पुढच्या काळात कोणते ऑफबीट ट्रेक करायचे याची स्वप्ने रंगवू लागलो, तोच घरातून जेवण तयार असल्याची हाक आली. पाटेकरांच्या घरचं जेवण म्हणजे निव्वळ सुख. मराठमोळं गावच्या शैलीतलं जेवण तर आहेच, पण तुम्ही कधीही गेलात तरी हमखास खायला मिळणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचं सार. त्याची अस्सल चव जेवणाची मजा द्विगुणित करते. तुम्ही ते सार एकदा तोंडी लावलंत की त्याची आवर्तनं झालीच म्हणून समजा.

तर असं ते सार पिऊन तृप्तीचे ढेकर देत आम्ही पानांवरून उठलो, बॅगा जागेवर लावल्या आणि सुटलो ते आजोबाच्या वाटेवर, काजवे बघायला. वाल्मिकी आश्रमाकडे जाणारी वाट आता पक्की डांबरी झाली आहे. आणि आता त्याला लागून बरेच फार्महाऊस बनत आहेत. त्यामुळे हा परिसर काही सामसूम राहीलेला नाही. आम्ही वर चढत होतो तसा एक गोंगाट आणि प्रकाशाचा लोट शांतता चिरत आमच्यापर्यंत पोचत होता. दर पाच मिनिटाला एक चारचाकी येत असे आणि तिच्या प्रकाशझोताने आम्ही तात्पुरते दृष्टीहीन होत असू. अशा किलकिलाटातही आम्हाला बऱ्यापैकी काजवे बघायला मिळाले. त्यांची खूप गर्दी होती असं जरी नसलं, तरी अधूनमधून होणार त्यांचं लुकलूकण सुखद होतं. एका वेळी तर झाडांवरचे काजवे आणि त्याच्या पलीकडे दिसणारे तारे यांतला फरक त्यांच्या चमकण्यावरूनच कळत होता. शेवटी सकाळी लवकर उठून ट्रेक सुरू करायचा आहे हे आठवून पुन्हा पाटेकरांच्या घराकडे वळलो आणि झोपेचं पांघरूण घेऊन गुडूप झालो.

पहाटे पाच वाजताच जाग आली. थोड्याच वेळात रतनगडाच्या मागून जांभळा प्रकाश डोकावू लागला. आणि नंतर त्याचं नारिंगी, गुलाबी असं परिवर्तन होऊन पांढरा होईपर्यंत आम्ही आन्हिके आटोपून बॅगा आवरल्या. पाऊस नसला तरी हवेत गारवा होता. पुन्हा एकदा पाटेकरांच्या घरातले कांदेपोहे आणि चहा घेऊन साडेसहाला आम्ही चोंढे बुद्रुककडे निघालो. चोंढे बुद्रुक इथे घाटघर निम्न धरण विद्युत प्रकल्प आहे. सह्याद्रीवरून खाली पडणाऱ्या पाण्याच्या साहाय्याने इथे वीजनिर्मिती केली जाते आणि यातले काही पाणी पंपाने पुन्हा वर घाटघर धरणात ओढून घेतले जाते.

घाटघर निम्न धरण विद्युत प्रकल्प

सात वाजत आले होते, तरी आम्ही सह्याद्रीच्या गार सावलीत होतो. योगेशने आम्हाला घाटघर निम्न धरणाच्या भिंतीजवळ नेऊन सोडलं आणि गाईड गणपतशी गाठ घालून दिली. इथूनच चोंढे घाटाची सुरुवात होते. कोकण आणि घाट यांना जोडणाऱ्या वाटा सह्याद्रीत फार पूर्वीपासून वापरात आहेत. त्यापैकी आजही तितक्याच वर्दळीची असलेली ही एक वाट खाली पालघर जिल्ह्यातल्या चोंढे आणि वर नगर जिल्ह्यातल्या घाटघर गावाला जोडते. रहदारी असल्याने बऱ्याच ठिकाणी बांधून काढलेली, आणि त्यामुळेच थोडी सोपी वाटलेली अशी ही वाट. आता धरणाच्या टोकापर्यंत डांबरी रस्ता असल्याने वाट तितकीही मोठी नाही, एखादा गावातला गडी अर्ध्या-पाऊण तासात घाटावर पोचेल.

घाटाचे वरचे टोक

योगेशचा निरोप घेऊन आणि स्वतःला गणपतच्या हवाली करत आम्ही घाटवाटेला लागलो. थोड्या झाडाझुडुपातून बाहेर येतो तोच आम्हाला घाटाचे वरचे टोक दिसू लागले. वाट फार लांब नसल्याची प्रचिती देत होते. आम्ही वाटेला आपलेसे केले आणि वाटेनेही आम्हाला! डोंगरची काळी मैना असलेल्या करवंदाचा खजिना आमच्यासमोर उभा करत ते जंगल आमचं स्वागत करत होतं. आम्हीदेखील 'घेणाऱ्याने घेत जावे' च्या थाटात नाही म्हटले नाही.

सह्याद्री नेहमीप्रमाणे पाठीराखा झाला होता. मागे आजोबा आणि शिपनुरचा डोंगर लक्ष ठेवून होता तर समोर घाटघरचा कडा सावली करून उभा होता. त्या गर्द रानामुळे उन्हाचा शीण जाणवत नव्हता. काही ठिकाणी उन्हाने झाडे वाळली होती खरी, पण थोड्याच दिवसात इथे हिरवे हिरवे गार गालिचे पसरणार होते. याच सावलीत एक छोटा थांबा घेत आम्ही पुन्हा वाटेला लागलो. वाट वर्दळीची असल्याने घाटघर वरून डोळखांबच्या बाजारात जाणारे बरेच गावकरी आम्हाला भेटत होते. आम्ही आपले ट्रेकिंगचे नियम पाळत सुती सैलसर कपडे, ट्रेकिंगचे शूज असा जामानिमा घालून वर चढत होतो. आणि गावकरी महिला मात्र साडी आणि स्लीपरमध्ये ताड ताड वाट उतरून खाली जात होत्या.

वाटेने उतरणारे गावकरी

आम्ही मग आमचा वेग वाढवत नऊच्या सुमारास वाटेचं वरचं टोक गाठलं. वरच्या टप्प्यात आम्हाला बांधून काढलेली वाट बघायला मिळाली. इथून दिसणारा खालचा कोकणाचा नजारा केवळ नेत्रसुखद होता. आजोबाच्या पलीकडे अंधुक दिसणारा माळशेज घाटाचा परिसर आणि त्याही मागे कर्जत भागातला सह्याद्री. समोर खाली घाटघर निम्न धरण आणि वळणावळणाची डांबरी सडक. आणि यावर आभाळातल्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. हे सगळं कॅनवासवरच्या एखाद्या निसर्गचित्रासारखं भासत होतं.

वरून दिसणारं कोकणाचं दृश्य

हा पॅनोरॅमिक नजारा डोळ्यात आणि कॅमेरात भरून घेतल्यावर आम्ही घाटघरकडे वळलो. घाटघर कोकणकड्यावरून पुन्हा हेच दृश्य, पण आता शिपनुरचा डोंगर नजरेआड गेल्याने थोडं फिक्कं झालेलं. या सर्वात उंबरदरा खिंड मात्र सह्रयाद्रीचं राकट रूप दाखवत होती. पुन्हा कधीतरी इकडून उतरण्याचे बेत रचून आम्ही घाटघर धरणाकडे वळलो. इथे एक वेगळीच गंमत होती. मागे कोकणाचा विलोभनीय परिसर आणि समोर धरणामागे मात्र अलंग-मदन-कुलंगचे ताशीव कडे सह्याद्रीचं आरसपानी सौंदर्य दाखवत उभे होते.

धरणामागे अलंग-मदन-कुलंगचे ताशीव कडे

ते सौंदर्य न्याहाळातच आम्ही गणपतच्या घरी पोचलो. तिकडे त्याची तिन्ही मुले आम्हाला बघताच लाजून खिडकीमागे जाऊन लपली. घर आणि परिस्थिती बेताची असली, तरी चांगला पाहुणचार करत गणपतच्या कुटुंबानं साधं पण रुचकर जेवण जेवू घातलं. अर्ध्या तासाची विश्रांती घेतली आणि वळलो ते घाटनदेवी मंदिराकडे. गावातून जाणाऱ्या डांबरी सडकेचा इथेच शेवट झाला होता. घाटनदेवी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू होतं, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाजूनेच उतरणारी दुसरी वाट पकडली.

घाटनदेवी

पहिली काही मिनिटे कड्याजवळून भर उन्हात उतरल्यावर ही वाटसुद्धा जंगलात शिरली. पुन्हा एकदा रानमेवा हाती लागला. करवंदे, अळू यांची फारच रेलचेल होती. जंगल पट्ट्यातली बरीचशी वाट विना उतार सरळसोट होती. चढणीच्या वाटेपेक्षा हिचा उतार कमी पण लांबलचक होता. त्यामुळे या वाटेवरून आम्हाला चोंढे खुर्द गावात पोचायला तब्बल दोन तास लागले. मागे वळून बघताना सपाट माळरानाच्या मागे सह्यादीचे कडे आम्हाला निरोप देत होते.

                                                                चोंढे खुर्द गावातून सह्याद्री

 

Comments

Popular posts from this blog

चला आकाशगंगा टिपुया!

ट्रेकिंग