ट्रेकिंग
तो आज पहिल्यांदाच ट्रेकिंगला निघाला होता, त्याच्या दादासोबत. तसं आईबाबांसोबत फिरला होता, राणीची बाग नाहीतर वॉटरपार्क. शाळेला सुट्टी पडल्यावर दादाने त्याचा ताबा घेतला, त्याला ट्रेकिंगला घेऊन जायला. जय्यत तयारी झाली. व्यवस्थित बॅग घेऊन आणि शूज घालून स्वारी निघाली. ट्रेनचा थोडा लांबचा प्रवास नेहमीपेक्षा वेगळा होता. रोजची गर्दीची स्टेशनं जाऊन एका निवांत स्टेशनवर तो उतरला. तिकडे धावपळ नव्हती की अनाऊन्समेंटचा भडिमार नव्हता. दादाने त्याच्या ग्रुपसोबत एका टमटममध्ये याला बसवलं. या रस्त्यांवर दुकानं-इमारती नव्हत्या, झाडेच झाडे होती, शेते होती. सगळं नवीन वाटणारं, पण कसं आनंददायी होतं. लांबवर एका डोंगरावरून धबधबे कोसळत होते. कित्ती भारी वाटत होतं!
टमटममधून उतरल्यावर दादाने उजवीकडे बोट दाखवून सांगितलं, "इथून जायचंय आपल्याला." दोन झाडांच्या मधून जाणारी ती पायवाट. पण ती दोन झाडे ओलांडल्यावर त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. समोर खळखळणारा ओढा होता, जो त्यांना पार करायचा होता. आणि मग समोरच्या शेतामधून जाणारी पायवाट पकडायची होती. त्याच्या अंगातून मज्जेच्या गुदगुल्या उठून गेल्या. शेतांमधून रानात शिरल्यावर रंगीबेरंगी फुले दिसायला लागली, कुठे कातळावर तर कुठे झाडाच्या बुंध्याशी. दादा अजबगजब फुलांची नावं सांगत होता. कधी न पाहिलेली, न ऐकलेली. रोजच्या कावळ्या-चिमण्यांच्या किलकीलाटाऐवजी वेगळे आवाज ऐकू येत होते.
पायवाट वर चढत होती, पण थकव्या ऐवजी मज्जा जास्त वाटत होती. कधी पायवाटेवर आडव्या झालेल्या एखाद्या अजस्त्र खोडाखालून, तर कधी एखाद्या उंच कातळावरून टुणकन उडी मारून जावं लागत होतं. घामाघूम होऊन स्वारी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचली. पुढ्यात आणखी एक वेगळं जग उभं ठाकलं. दगडी तटबंदीच्या वरच्या टोकापर्यंत त्याची नजरही पोचत नव्हती. महादरवाजातून प्रवेश करताना त्याला इतिहासाच्या पुस्तकात शिरल्यासारखं वाटत होतं. ते फंटूश सिनेमात घडतं ना, अगदी तसं.
या इथे कधीकाळी मावळ्यांचा खडा पहारा असेल नै! त्या तिकडच्या सदरेवर कोणत्या मोहिमेची आखणी झाली असेल बरं! अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात काहूर माजवलं होतं. प्रश्नांची उत्तरं द्यायला सोबत दादा होताच. पाण्याची टाकं, दरवाजाचे अवशेष, गुहा, शिलालेख हे सगळं न्याहाळत तो इतिहासातल्या इथल्या वैभवाची कल्पना करत होता. गडावर पाहिलेलं आणि इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं त्याला रिलेट करावसं वाटत होतं.
पुढं एका जीर्ण वाड्यापाशी जाऊन तो थबकलाच. कधीकाळी राजांचे पाय या वाड्याला लागले असतील का? कल्पनेनेच त्याच्या अंगावर शहारे आले. हे आज सगळं आपल्याला दादामुळे बघायला मिळतंय याचाही आनंद झाला. बराच वेळ तो तिथेच घुटमळत राहिला. दादा आणि त्याच्या ग्रुपसोबत गडफेरी पूर्ण करून तो जेव्हा महादरवाजापाशी परत आला, त्याने मागे वळून पाहिलं. त्याला पडके अवशेष दिसत नव्हते, तर त्यांच्या भोवती मावळ्यांचा पहारा दिसत होता. सदरेवर बैठकांची रांग दिसत होती. आणि मध्यभागी बसलेले राजे! प्रत्येक पायरी उतरताना तो मागे वळून पाहत होता. येताना तो घामाघूम झाला होता खरा, पण आता मात्र पावले जड झाली होती.
भा. रा. तांबेंची 'या बाळांनो, या रे या' ही कविता तो आज खऱ्या अर्थाने जगला होता. आता दादासोबत वीकेंडला
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया
हे मनाशी पक्के करत तो टमटममध्ये बसला.
Comments
Post a Comment