चला आकाशगंगा टिपुया!

२२ एप्रिल २०२३ च्या रात्री आमची डेहणेला पहिल्यांदा आकाशगंगा फोटोग्राफी ट्रिप झाली. अभिजित, अरविंद आणि मला अगदी हेवा वाटेल असे फोटो मिळाले. दुसऱ्या दिवशी अरविंदचा मेसेज आला, "अरे आपण तर आकाशगंगेचाच भाग आहोत, मग आपण त्याचा फोटो कसे काय काढू शकलो? आपण फोटो काढले त्यावर माझ्या मित्रांनी हा प्रश्न विचारलाय." हा प्रश्न खरेच कुतूहलाचा, पण आपण जसे सूर्यमालेत राहून बुध, गुरु, शुक्र, मंगळ, गुरु, शनी हे ग्रह बघू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचा पट्टा आपण पाहू शकतो. अगदी साध्या डोळ्यांनीसुद्धा, काही अंशी.

विश्वात असंख्य आणि अफाट अशा दीर्घिका आहेत. या दीर्घिका सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. त्या दिसताना सपाट भासत असल्या तरी अशा सपाट चकतीची जाडी काही शे ते काही हजार प्रकाशवर्षे असू शकते. आपली सूर्यमाला ही अशाच एका सर्पिलाकार दीर्घिकेचा भाग आहे, तिचं नाव आकाशगंगा. या आकाशगंगेचा व्यास १,००,००० प्रकाशवर्षे असून तिच्या केंद्रापासून आपली सूर्यमाला दोन तृतीयांश अंतरावर आहे. हे अंतर जवळपास ३०००० प्रकाशवर्षे आहे. आकाशगंगेची केंद्राजवळ जाडी ५००० प्रकाशवर्षे असून कडेला ती २००० प्रकाशवर्षे इतकी आहे. आकाशगंगेत अंदाजे २०० ते २५० अब्ज तारे आहेत.

ग्रीक पौराणिक कथेनुसार ज्युटपिर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग" (Milky Way) असे नाव ठेवले.

आता ही आकाशगंगा शोधायची कशी? अगदी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे आपण आकाशगंगेचा भाग आहोत, त्यामुळे आपण संपूर्ण आकाशगंगा पाहू शकत नाही. पण त्याचा केंद्राकडचा भाग नक्की पाहू शकतो. आकाशगंगेचा दुधाळ पट्टा शर्मिष्ठा (Cassiopeia), मिथुन (Gemini), नौकातल (Carina), नरतुरंग (Centaurus), धनु (Sagittarius), आणि हंस (Cygnus) या तारकासमूहातून जातो. आपल्याला आकाशात हे तारकासमूह शोधायला लागतील. महाराष्ट्रात साधारणतः हा पट्टा उगवण्याच्या वेळी दक्षिण-पूर्व ते उत्तर-पूर्व असा जाताना दिसतो. हल्ली स्मार्टफोनसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत जे आपल्याला दिसणाऱ्या आकाशाचा त्या क्षणाचा (Live) नकाशा दाखवतात आणि तारकासमूह देखील दाखवतात. अगदी काही ॲप्स तर आकाशगंगेची स्थितीसुद्धा दर्शवतात.

भारतात साधारणतः फेब्रुवारी ते मे या काळात रात्री आकाशात हे तारकासमूह असतात. त्यामुळे तुम्ही या काळात आकाशगंगा पाहण्याचा प्रयत्न करू शकता. सध्या अनेक आकाशनिरीक्षण संस्था कार्यरत आहेत ज्या अशा प्रकारच्या आकाश निरीक्षण सहली आयोजित करत असतात. त्यांच्यासोबत असलेले मार्गदर्शक खगोलशास्त्रीय दुर्बिणीच्या साहाय्याने आपल्याला आकाशातील ग्रहगोलांची सफर घडवून आणतात. जर तुम्हाला स्वतःहून आकाशगंगा बघायची आणि कॅमेरात टिपायची असेल तर सर्वात आधी अशा जागेचा शोध घ्या जिथे काळोख्या रात्री कृत्रिम दिव्यांचा आणि कृत्रिम प्रकाशाचा व्यत्यय येणार नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात तुम्हाला अशा जागा सापडू शकतील. आणखी एका गोष्टीची दक्षता घ्यायची ती म्हणजे रात्रीच्या वेळी प्रकाशाचा मोठा स्रोत असलेला चंद्र टाळायचा. त्यासाठी अमावस्येची रात्र किंवा चंद्र दिवसा आकाशात असेल अशी रात्र निवडावी. वर दिलेल्या तारकासमूहांची उगवण्याची वेळ नमूद करून ठेवावी.

ज्यावेळी तुमचे डोळे मिट्ट काळोखाला सरावतील, तेव्हा तुम्हाला आकाशात उगवलेल्या आकाशगंगेचे फिक्कट ढग किंवा पुंजका म्हणून दर्शन होईल. कृपया अशा वेळी मोबाईलचा फार वापर करू नका, नाहीतर डोळ्यांना मिट्ट अंधाराची सवय होणार नाही. आता जर तुम्हाला आपली आकाशगंगा कॅमेरात टिपयची असेल तर मात्र थोडे कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी तुमच्याकडे हवा एखादा DSLR कॅमेरा आणि एक वाईड लेन्स, बेसिक किट लेन्स चालून जाईल. त्यासोबतच तुमच्याकडे हवा एक ट्रायपॉड. रात्रीच्या वेळी अवकाशस्थ गोष्ट टिपणे हे long exposure फोटोग्राफीचं काम असल्याने ट्रायपॉड असणं गरजेचं आहे. हल्लीच्या काळात प्रो मोड (shutter, iso, focal distance, white balance, exposure) असलेले स्मार्टफोनही तुम्हाला चांगला फोटो काढून देऊ शकतात.

तर ही झाली पूर्वतयारी. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कॅमेराच्या कोणत्या सेटिंग्स वापराव्यात हे थोडक्यात बघुयात. DSLR कॅमेरा मॅन्युअल मोडवर वापरावा. यात exposure triangle च्या बेसिक सेटिंग्स खालीलप्रमाणे:
Shutter: १५ सेकंद
Aperture: शक्य तितका मोठा (या settingचा सगळ्यात लहान नंबर)
ISO: ८०० ते १६०० यात प्रयोग करून बघावेत.
फोटो शक्यतो रॉ (RAW) मोडमध्ये काढावेत, जेणेकरून नंतर ते एडिट करताना आपल्याला बराच कंट्रोल मिळतो.

याखेरीज आणखी कोणत्या सेटिंग्स तुम्हाला चांगला फोटो मिळण्यास मदत करतील ते ढोबळमानाने पाहुयात. लेन्सचा फोकस मोड मॅन्युअल ठेवावा. यात तुम्हाला लेन्सवरची फोकस रिंग फिरवून फोकस पक्का करावा लागतो. त्यासाठी कॅमेरा आकाशात एखाद्या तेजस्वी दिसणाऱ्या ताऱ्याकडे वळवावा. कमेरातून तो अतिशय लहान आणि स्पष्ट बिंदू दिसेल अशा प्रकारे फोकस रिंग जमवून घ्यावी. हे शक्य होत नसेल तर एखाद्या लहानशा कृत्रिम प्रकाशस्त्रोताला (विजेरी घेऊ शकता) कॅमेरापासून ३० किंवा जास्त पावलांच्या अंतरावर ठेवून वरील कृती करावी. याने काय होते, तर तुम्ही तुमच्या कॅमेराला अनंत अंतरावरच्या गोष्टींवर केंद्रित करता. बऱ्याच कॅमेरामध्ये इन्फिनिटी (Infinity) ही खूण असते. पण त्यावर नेल्यावर कॅमेरा अनंत अंतरावर केंद्रित होईलच याची खात्री देता येत नाही.

प्रत्येक कॅमेरामध्ये कॅमेराच्या हालचालीमुळे फोटोमध्ये येणारे कंपन कमी करण्याचे तंत्रज्ञान असते. Nikon मध्ये हे Vibration Reduction (VR) आणि Canon मध्ये Image Stabilization (IS) या नावाने ओळखले जाते. ही सेटिंग बंद करून ठेवावी. या सेटिंगमुळे कृत्रिम इमेज सॉफ्टनेस येऊ शकतो. त्याचसोबत मेनु मधून Long exposure NR आणि High ISO NR या सेटिंग्स बंद ठेवाव्यात. हे noise reduction तुम्ही फोटो एडिटिंगमध्ये जमवून आणणे जास्त चांगले. याउलट ही सेटिंग कार्यरत असताना कॅमेरा फोटो तयार करायला जास्त वेळ घेतो. या सगळ्या सेटिंग्स DSLR बाबतीत झाल्या. पण तुम्ही जर एखाद्या स्मार्टफोनने फोटो काढत असाल तर मात्र वर दिलेला exposure triangle (Shutter, Aperture, ISO) पाळावा. फोटोग्राफी आणि त्यातही मॅन्युअल मोडवर आपण करत असलेली फोटोग्राफी हा सगळा सेटिंग्सचा खेळ आहे. त्यामुळे एखाद्या सेटिंगमध्ये विशेष चांगला फोटो मिळत नसेल तर नक्कीच थोडेफार बदल करून बघावेत.

तर ही झाली सेटिंग्सची गोष्ट! आता फोटोच्या रचनेची (Composition) चर्चा करायची झाल्यास मी म्हणेन कि आधी तुम्ही फक्त आकाशगंगेचा फोटो काढण्याचा प्रयत्न करा. तो एकदा का सफल झाला कि मग अग्रभागी एखादे वाहन, झाडे, वास्तू अशा गोष्टींची व्यवस्था करून फोटो अधिक लक्षवेधक बनवू शकता. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांचा धांडोळा घेऊन आकर्षक भासणाऱ्या जागा निवडून तिकडे फोटोग्राफी करू शकता. रचनेसोबतच संपादन (Editing) ही या फोटोग्राफीची आणखी एक महत्वाची बाजू. पण यावर व्यक्तिगत प्राधान्य जास्त मोलाचे, तेव्हा मी याबद्दल फार काही लिहिणार नाहीये.

वरील सर्व लिखाणाचा परिणाम हा तुमचा फोटो असायला हवा. एकदा का दिलेल्या तारकासमूहांची उगवण्याची वेळ झाली किंवा तुमच्याकडच्या अँपने त्यांची आकाशातली उपस्थिती दर्शवली कि तुम्ही योग्य त्या दिशेला तुमचा कॅमेरा सरसावून आकाशगंगेचा पट्टा तुमच्या कॅमेरात टिपायला सज्ज. हा पट्टा जसा आकाशात वर चढत जाईल तसा तो प्रकर्षाने दिसायला लागेल. आपल्याला दिसणारे विश्व अफाट आहे. खगोलीय वस्तूंची फोटोग्राफी हाही असाच एक न संपणारा विषय. यात तुम्हाला लागणाऱ्या तांत्रिक बाबी आणि सेटिंग्स जमवण्यात तुम्ही एकदा का तरबेज झालात, कि मग अनंत अशा विश्वाचे दालन तुमच्यापुढे खुले होईल.

 




Comments

Popular posts from this blog

चोंढे घाट ट्रेक

ट्रेकिंग