जंगली डॉक्टर

असं नाव ठेवायला कारणही तसंच आहे. आमचा कोकणातला पक्षीनिरीक्षणाचा दौरा ठरला. डॉक्टर आम्हाला गाईड म्हणून लाभणार होते. अभिजित पावसाळ्याच्या आधीच त्यांच्यासोबत फिरला होता. त्यामुळे त्याला त्यांच्या कौशल्याचा अनुभव होताच. म्हणून आता पावसाळा उलटून गेल्यावर नोव्हेंबरमध्ये ही ट्रिप ठरली. डॉक्टरांच्या मताने तळकट, कोलझर, झोळंबे आणि नंतर जमल्यास तिलारीमध्ये जायचे पक्के झाले. कोलझरमध्ये राहण्याची जागा पक्की झाली आणि मग गाडीची तिकिटेसुद्धा.

१७ नोव्हेंबरला वालावलमध्ये पोचलो आणि १८ नोव्हेंबरच्या पहाटेच डॉक्टरांची गाडी आम्हाला न्यायला लक्ष्मीनारायण मंदिराजवळ हजर. गाडीत बसून निघत नाही तोच त्यांनी गाडी चालवत, आजूबाजूला नजर टाकत दिसणाऱ्या पक्षांची नावे सांगायला सुरुवात केली. खरंतर रस्त्याच्या कडेने दिसणारे पक्षी हे नेहमीचेच, पण तरीही ते मोठ्या उत्साहात सांगत होते. बांद्याहून गाडी जेव्हा तळकटकडे वळली तेव्हा त्यांची नजर आणखी तिक्ष्ण झाली. आणि तळकट उद्यान ओलांडून जेव्हा आम्ही खडपडे घाटाकडे वळलो तेव्हा तर त्यांचे कानही तिक्ष्ण झाले. जंगलातला डांबरी रस्ता जिथे संपतो, तिथे गाडी लावून आम्ही चालत पुढे जाऊ लागलो तसे डॉक्टर अधिकच सावध होत गेले. कुठे झाडांच्या पानाआड एखादा पक्षी दिसतोय का किंवा कोणाचा कॉल ऐकू येतोय का याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. आधी वाऱ्यामुळे पक्षांची हालचाल कमीच जाणवत होती. पण नंतर जसे पुढे सरकत गेलो, तसा किलबिलाट वाढला. पक्षांचे आवाज ओळखण्यात ते तरबेज होतेच, पण काही वेळा तर ते स्वतः शीळ घालून आवाज काढत होते.

तीन दिवस आमच्यासोबत फिरून त्यांनी शिंजिर (sunbirds), बुलबुल (bulbuls), वटवटे (warblers), कस्तुर (thrushes), सातभाई (babblers), सुतार (woodpeckers), पर्णपक्षी (leafbirds), खाटीक (shrikes), खंड्या (kingfishers), हळद्या (orioles), घुबड, (owls), तांबट (barbets), राघू (bee-eaters), कोतवाल (drongos), पारवा (pigeons), धनेश (hornbills), अशा अनेक पक्षांचं दर्शन घडवून आणलं. ही यादी जवळपास ७०-८०च्या घरात गेली. दाढीवाला राघू हा अभावानेच दिसणारा पक्षीसुद्धा त्यांनी आम्हाला ७-८ वेळा दाखवला. तरीही मलबारी कर्णा (trogon) राहून गेल्याची रुखरुख त्यांना होतीच. त्यासाठी त्यांनी आमच्यासोबत तळकट जंगल, तळकट वनउद्यान, कोलझर जंगल, धामापूर तलाव असा बराच परिसर पालथा घातला.

श्रीकृष्ण मगदूम, पेशाने डॉक्टर पण मन मात्र जंगलात रमलेलं. गेली ५-६ वर्षे पक्षिनिरीक्षणात घालवले असूनही पक्षी दाखवण्याचा त्यांचा उत्साह केवळ लाजवाब. मलबारी कर्णा (Trogon) न दिसल्याची त्यांना लागलेली रुखरुख आणि तो शोधायला त्यांनी घेतलेली मेहनत याने आम्ही थक्क झालो होतो. नजर तर अशी तीक्ष्ण, कि एखादा पिंटुकला पक्षीसुद्धा त्यांच्या नजरेतून सुटणं अवघड. आमच्या ३ दिवसांच्या सहवासात त्यांनी अगदी गाडी चालवतानाही बरेच पक्षी नजरेने टिपले. धामापूरहून परतताना त्यांनी अचूक टिपलेली मोरघार (Crested Hawk Eagle) मी विसरू शकणार नाही.

जी गोष्ट नजरेची, तीच कानांची! पक्षांचे बारीक आवाज टिपणं आणि ते ओळखणं यात त्यांचं कौशल्य अफलातून! बऱ्याच पक्षांच्या केवळ आवाजावरून डॉक्टरांनी त्यांचा माग काढला. याबाबतीतला एक किस्सा - एका संध्याकाळी ट्रेल करून आम्ही मंडूकमुखी (Ceylon Frogmouth) हा पक्षी पाहिला आणि नंतर सांबराचे अलर्ट कॉल चालू झाल्याने आम्ही परतलो. त्याच रात्री ३ वाजता डॉक्टरांनी वाघाची डरकाळी ऐकल्याचे सकाळी सांगितले. सांबराचा कॉल हा या वाघासाठीच असावा अशी आमची पक्की धारणा आहे.

कोणत्याही दुसऱ्या गाईडने ठरवलेले पक्षीनिरीक्षणाचे सत्र आटोपल्यावर आराम करणं पसंत केलं असतं. पण डॉक्टरांची गोष्टच वेगळी! त्यांनी पहिल्याच दिवशी सकाळी ८:३० ते ११ तळकट जंगल, १२ ते १:३० तळकट वनउद्यान, संध्याकाळी ४:३० ते ७ कोलझर जंगल आणि पुन्हा ८ ते ९:३० तळकट जंगल असा सत्रांचा रतीब घातला तो वेगवेगळे पक्षी दाखवण्यासाठीच! त्यांच्या जंगलातल्या किश्श्यांनी आम्ही अवाक होत होतोच, पण तीन वेळा बिबट्यासोबत गाठ पडल्याच्या किश्श्यांनी आमच्या अंगावर शहारे आले होते. त्यांची एखाद्या रात्री जंगलातल्या मचाणावर वेळ घालवण्याची महत्वाकांक्षा केवळ रोमांचित करणारी! अतिशय शांत स्वभाव, कुठेही वाद घालायची नसलेली प्रवृत्ती, आणि कामातला प्रामाणिकपणा यामुळे त्यांचा ठसा त्यांच्यासोबत असलेल्यांवर न पडला तरच नवल.

मूळचे कोल्हापूरचे असणारे डॉक्टर आजोळ कोकणात म्हणून बालपणी कोकणात रमले आणि आता इकडच्या वन्यजीव अधिवासात दंग होऊन कोकणातले झाले. तुम्हालाही सिंधुदुर्गात पक्षीनिरीक्षणासाठी जायचे असल्यास नक्की डॉक्टरांची सोबत घ्या! त्यांचा इन्स्टा आयडी - Shrikrishna Magdum

Comments

Popular posts from this blog

चला आकाशगंगा टिपुया!

चोंढे घाट ट्रेक

ट्रेकिंग