Posts

Showing posts from May, 2024

ट्रेकिंग

Image
तो आज पहिल्यांदाच ट्रेकिंगला निघाला होता, त्याच्या दादासोबत. तसं आईबाबांसोबत फिरला होता, राणीची बाग नाहीतर वॉटरपार्क. शाळेला सुट्टी पडल्यावर दादाने त्याचा ताबा घेतला, त्याला ट्रेकिंगला घेऊन जायला. जय्यत तयारी झाली. व्यवस्थित बॅग घेऊन आणि शूज घालून स्वारी निघाली. ट्रेनचा थोडा लांबचा प्रवास नेहमीपेक्षा वेगळा होता. रोजची गर्दीची स्टेशनं जाऊन एका निवांत स्टेशनवर तो उतरला. तिकडे धावपळ नव्हती की अनाऊन्समेंटचा भडिमार नव्हता. दादाने त्याच्या ग्रुपसोबत एका टमटममध्ये याला बसवलं. या रस्त्यांवर दुकानं-इमारती नव्हत्या, झाडेच झाडे होती, शेते होती. सगळं नवीन वाटणारं, पण कसं आनंददायी होतं. लांबवर एका डोंगरावरून धबधबे कोसळत होते. कित्ती भारी वाटत होतं! टमटममधून उतरल्यावर दादाने उजवीकडे बोट दाखवून सांगितलं, "इथून जायचंय आपल्याला." दोन झाडांच्या मधून जाणारी ती पायवाट. पण ती दोन झाडे ओलांडल्यावर त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. समोर खळखळणारा ओढा होता, जो त्यांना पार करायचा होता. आणि मग समोरच्या शेतामधून जाणारी पायवाट पकडायची होती. त्याच्या अंगातून मज्जेच्या गुदगुल्या उठून गेल्या. शेतांमधून

ट्रेकर्सची सिद्धता पाहणारा सिद्धगड

Image
मार्च, एप्रिल, मे हे खरेतर कडक उन्हाचे महिने. त्यातच हा काळ महाराष्ट्रात आकाशनिरीक्षण करण्यास अगदी योग्य. त्यामुळे शक्यतो दिवसा ट्रेकिंग टाळायचं आणि आकाश फोटोग्राफीचे कार्यक्रम आखायचे असं ठरवलं होतं. अगदी ९-१० मार्चला डेहणेला कॅम्पिंग सुद्धा ठेवलं होतं. पण नंतरच्या अभ्यासात कळलं की त्यादिवशी आकाशगंगेची उगवण्याची वेळ रात्री साडेतीनला आहे. त्यानंतर तांबडं फुटेपर्यंत फोटोग्राफीसाठी फारच थोडा वेळ मिळणार होता. मग आधीच हा कार्यक्रम एप्रिलमध्ये ढकलून दिला. अशातच मग ९-१० मार्चसाठी सिद्धगड ट्रेकिंग प्लॅन केल्याचा परागचा कॉल आला. ट्रेक दोन टप्प्यात असल्याने लगेच होकार कळवून टाकला. खरंतर आधी कल्याणहून एखाद्या जीपने पायथ्याला जायचा प्लॅन होता, पण ट्रेकला चारच गाडी आहेत कळल्यावर पराग यांनी बोरिवलीहून सरळ आपली निक्सन बाहेर काढली. मला पातलीपाडाला आणि रोहनला साकेतला गाडीत बसवून त्यांनी म्हसाचा रस्ता धरला. तर वरूण बदलापूरहून थेट बाईकने आला. नारीवलीच्या पुढे उचले गावातून आम्ही आत वळलो आणि दीड-दोन किलोमीटर आत असलेल्या एका घराच्या अंगणात आम्ही गाड्या लावल्या. वाटेत घेतलेल्या कलिंगड आणि द्राक्षांची जुळवाजु

चोंढे घाट ट्रेक

Image
जसजसे आम्ही डेहणेच्या जवळ पोचत होतो, तसतसा आजोबाचा डोंगर अजस्त्र भासत होता. पाटेकरांच्या अंगणात बसून आमच्या ट्रेकबद्दलच्या गप्पा रंगल्या. पराग आणि रत्नाकर फारच अनुभवी ट्रेकर. त्यांचे किस्से ऐकण्यात गंमत वाटत होतीच. पुढच्या काळात कोणते ऑफबीट ट्रेक करायचे याची स्वप्ने रंगवू लागलो, तोच घरातून जेवण तयार असल्याची हाक आली. पाटेकरांच्या घरचं जेवण म्हणजे निव्वळ सुख. मराठमोळं गावच्या शैलीतलं जेवण तर आहेच, पण तुम्ही कधीही गेलात तरी हमखास खायला मिळणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचं सार. त्याची अस्सल चव जेवणाची मजा द्विगुणित करते. तुम्ही ते सार एकदा तोंडी लावलंत की त्याची आवर्तनं झालीच म्हणून समजा. तर असं ते सार पिऊन तृप्तीचे ढेकर देत आम्ही पानांवरून उठलो, बॅगा जागेवर लावल्या आणि सुटलो ते आजोबाच्या वाटेवर, काजवे बघायला. वाल्मिकी आश्रमाकडे जाणारी वाट आता पक्की डांबरी झाली आहे. आणि आता त्याला लागून बरेच फार्महाऊस बनत आहेत. त्यामुळे हा परिसर काही सामसूम राहीलेला नाही. आम्ही वर चढत होतो तसा एक गोंगाट आणि प्रकाशाचा लोट शांतता चिरत आमच्यापर्यंत पोचत होता. दर पाच मिनिटाला एक चारचाकी येत असे आणि तिच्या प्रकाशझो

चला आकाशगंगा टिपुया!

Image
२२ एप्रिल २०२३ च्या रात्री आमची डेहणेला पहिल्यांदा आकाशगंगा फोटोग्राफी ट्रिप झाली. अभिजित, अरविंद आणि मला अगदी हेवा वाटेल असे फोटो मिळाले. दुसऱ्या दिवशी अरविंदचा मेसेज आला, "अरे आपण तर आकाशगंगेचाच भाग आहोत, मग आपण त्याचा फोटो कसे काय काढू शकलो? आपण फोटो काढले त्यावर माझ्या मित्रांनी हा प्रश्न विचारलाय." हा प्रश्न खरेच कुतूहलाचा, पण आपण जसे सूर्यमालेत राहून बुध, गुरु, शुक्र, मंगळ, गुरु, शनी हे ग्रह बघू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचा पट्टा आपण पाहू शकतो. अगदी साध्या डोळ्यांनीसुद्धा, काही अंशी. विश्वात असंख्य आणि अफाट अशा दीर्घिका आहेत. या दीर्घिका सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. त्या दिसताना सपाट भासत असल्या तरी अशा सपाट चकतीची जाडी काही शे ते काही हजार प्रकाशवर्षे असू शकते. आपली सूर्यमाला ही अशाच एका सर्पिलाकार दीर्घिकेचा भाग आहे, तिचं नाव आकाशगंगा. या आकाशगंगेचा व्यास १,००,००० प्रकाशवर्षे असून तिच्या केंद्रापासून आपली सूर्यमाला दोन तृतीयांश अंतरावर आहे. हे अंतर जवळपास ३०००० प्रकाशवर्षे आहे. आकाशगंगेची केंद्राजवळ जाडी ५००० प्रकाशवर्षे असून कडेला ती २००० प्रकाशवर्षे