ट्रेकर्सची सिद्धता पाहणारा सिद्धगड

मार्च, एप्रिल, मे हे खरेतर कडक उन्हाचे महिने. त्यातच हा काळ महाराष्ट्रात आकाशनिरीक्षण करण्यास अगदी योग्य. त्यामुळे शक्यतो दिवसा ट्रेकिंग टाळायचं आणि आकाश फोटोग्राफीचे कार्यक्रम आखायचे असं ठरवलं होतं. अगदी ९-१० मार्चला डेहणेला कॅम्पिंग सुद्धा ठेवलं होतं. पण नंतरच्या अभ्यासात कळलं की त्यादिवशी आकाशगंगेची उगवण्याची वेळ रात्री साडेतीनला आहे. त्यानंतर तांबडं फुटेपर्यंत फोटोग्राफीसाठी फारच थोडा वेळ मिळणार होता. मग आधीच हा कार्यक्रम एप्रिलमध्ये ढकलून दिला. अशातच मग ९-१० मार्चसाठी सिद्धगड ट्रेकिंग प्लॅन केल्याचा परागचा कॉल आला. ट्रेक दोन टप्प्यात असल्याने लगेच होकार कळवून टाकला.

खरंतर आधी कल्याणहून एखाद्या जीपने पायथ्याला जायचा प्लॅन होता, पण ट्रेकला चारच गाडी आहेत कळल्यावर पराग यांनी बोरिवलीहून सरळ आपली निक्सन बाहेर काढली. मला पातलीपाडाला आणि रोहनला साकेतला गाडीत बसवून त्यांनी म्हसाचा रस्ता धरला. तर वरूण बदलापूरहून थेट बाईकने आला. नारीवलीच्या पुढे उचले गावातून आम्ही आत वळलो आणि दीड-दोन किलोमीटर आत असलेल्या एका घराच्या अंगणात आम्ही गाड्या लावल्या. वाटेत घेतलेल्या कलिंगड आणि द्राक्षांची जुळवाजुळव केली आणि दुपारी चार वाजता सिद्धगडमाचीची वाट धरली.

ट्रेकची सुरुवात

एक सुकलेला ओढा ओलांडून वाट एक वाडीत शिरली, आणि त्यानंतर हळूहळू छोट्या टेकडीवरून चढू लागली. थंडीचे दिवस सारून गेले होते, आणि उष्मा वाढत होता. संध्याकाळचा प्लॅन फक्त माचीपर्यंत पोचायचा असल्याने आम्हीही फार वेगात चढाई न करता आरामात वाट कापत होतो. सिद्धगडाची वाट भीमाशंकर अभयारण्याचा भाग असलेल्या डोंगरांमधून जाते. जागोजागी इथे दिसणाऱ्या वेगवेगळ्या पक्षी-प्राण्यांची माहिती असलेले बोर्ड दिसतात. आम्हीही वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकत पुढे सरकत होतो. उतरत्या उन्हात उघड्या डोंगरावरून चढाई केल्यावर पहिल्या अर्धा तासातच आम्ही पहिला थांबा घेतला आणि द्राक्षे पोटात रिचवली.

हळूहळू वाट दाट जंगलात शिरत गेली आणि आम्हाला हायसे वाटू लागले. एका ठिकाणी तर वाटेवर वेलींची कमान तयार झाली होती आणि खाली खूप सारी फुलपाखरे बागडत होती. हे खरंतर हरखायला लावणारं दृष्य होतं. जंगलातल्या या वाटेवर डाव्या बाजूला खेतोबाचा डोंगर आमची सोबत करत होता तर उजवीकडे आमचं गंतव्य स्थळ म्हणजे सिद्धगड ताठ उभा होता. ट्रेकचा मार्ग हा बऱ्यापैकी सुभेदार धबधब्याच्या ओढ्याजवळून जात होता. काही वेळा तर सुकलेला ओढ क्रॉस करायला लागला. पावसाळ्यात हा काम थोडं जिकरीचं होऊ शकतं. सहाच्या सुमारास आम्ही हा जंगल पट्टा पार करून पहिल्या पाण्याच्या टाक्याजवळ पोचलो. माचीच्या चढाईवर असलेलं हे टाकं वाटसरूंची तहान भागवायला पुरेसं असलं तरी सध्या त्यातलं पाणी पिण्यायोग्य नाहीये. इथून थोड्या वेळातच आम्हाला माचीच्या बाजूने असलेली गडाची तटबंदी दिसायला लागली. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याआधी आम्ही डाव्या बाजूला असलेल्या एका पठारावर वळलो. इथे काही समाध्या बघायला मिळतात. तर दरवाजातून आत प्रवेश केल्यावर एक प्रशस्त देऊळ लागते. पण आता अंधार पडायला सुरुवात झाल्याने आम्ही तडक माचीवरच्या वस्तीकडे निघालो.

पाण्याचे टाके
 
समाधी

वस्तीच्या सुरुवातीलाच पडक्या शाळेचे अवशेष दिसले. ते पाहून परागच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कधी काळी या शाळेच्या आवारातच आपण तळ ठोकल्याचे आठवून आणि आता त्या शाळेची परिस्थिती पाहून त्यांना गदगदून आले. पण शाळाच काय तर संपूर्ण माचीवरची वस्ती कमी होऊ लागली आहे. इथे पोचायला दोन तासांची पायपीट करण्याशिवाय पर्याय नसल्याने माचीवरच्या वस्तीची फारच गैरसोय होते. शिवाय शाळा आणि नोकरीसाठी आता बरीच वस्ती खाली स्थलांतरित झालेली आहे. माचीवर राहत असलेल्या एका दादांच्या अंगणात बॅगा टाकून पाठीला टेकू दिला. रात्री जेवणानंतर पुन्हा एकदा आकाश फोटोग्राफीची हुक्की आली. रोहन, वरुण आणि मी माचीवरच्या खुल्या भागाकडे वळलो. एवढ्या लवकर आकाशगंगा दिसू शकणार नव्हती. मग सिद्धगड बालेकिल्ल्याकडे मोबाईल कॅमेरा रोखून स्टारट्रेलसाठी पुरेसे शॉट्स घेतले आणि सकाळी लवकर ट्रेक सुरू करायचा असल्याने पुन्हा दादांच्या अंगणात येऊन स्वतःला निद्रादेवीच्या स्वाधीन केलं.

पडकी शाळा
 
स्टारट्रेल

सकाळी आमच्या मोबाईलचे गजर वाजायच्या आधीच कोंबड्याच्या भारदस्त बांगेने आमची झोप उडून गेली. गडाचा माथा सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाला होता. आन्हिके, चहा-नाष्टा आटोपून आम्ही पुन्हा एकदा आमच्या बॅगा आवळल्या आणि सात वाजता सिद्धगडाच्या खड्या चढाईसाठी सज्ज झालो. सुरुवातीची काही मिनिटे दाट झाडीतून चढाई करून आम्ही उघड्या भागात आलो. थोडी घसरणीची वाट सुरू झाली. पहिल्या गुहेपर्यंतचा पट्टा तरी व्यवस्थित पार पडला. इथून पुढे मात्र जागोजागी उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचे टप्पे लागत होते. चढताना अजिबात त्रास न देणारे हे टप्पे उतरायचे कसे हाच विचार मनात ठेवून बालेकिल्ल्याचा माथा गाठला. पावसाळ्यात हा पूर्ण चढ अतिशय कठीण श्रेणीचा होऊ शकतो.

माचीवरून बालेकिल्ल्याकडे

कातळात कोरलेल्या पायऱ्या

माथ्यावर पोचल्यावर मात्र संपूर्ण ३६० अंशातलं दृष्य भारावून टाकणारं होतं. गडाच्या दक्षिणेला लोणावळ्यापर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. श्रीमलंगगड, ताहुली, नाखिंड, माथेरान, कोथळीगड, पदरगड, भीमाशंकर दिसत होते. दक्षिणेला पुढ्यात ठेंगणे भासणारे गोरखगड-मच्छिंद्रगड हे जोडदुर्ग उभे होते आणि लांबवर अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, गवळदेव, आजोबा ही गिरीशिखरे एका रांगेत उभी असल्यासारखी भासत होती. काही ठिकाणी धुक्याचं साम्राज्य आणि काही ठिकाणी लख्ख उजेड पडला होता. बालेकिल्ला म्हणजे डोंगरमाथ्याचा एक अरुंद पट्टाच होता. बालेकिल्ल्यावर शिवाचा नंदी, पाण्याची टाके आणि उरलेसुरले दरवाजाचे अवशेष गडाच्या प्राचीन वैभवाची साक्ष द्यायला पुरेसे होते. मोजकाच आवाका असलेल्या बालेकिल्ल्यावर मात्र पाण्याचे सहा-सात टाके होते.

किल्ल्याच्या उत्तरेकडे
 
किल्ल्याच्या दक्षिणेकडे

गडफेरी पूर्ण करून उतराईला लागलो आणि मनात धस्स झालं. दगडी पायऱ्यांचा तीव्र उतार अंगावर आल्यासारखा भासत होता. घसरण त्या दाहकतेत आणखी भर टाकत होती. अगदी काळजीपूर्वक पहिल्या गुहेपाशी आलो तेव्हा हायसं वाटलं. माचीवर येऊन पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि मंदिराकडे वळलो. पण मंदिराच्या आधीच शिवाचं आणखी एक देवस्थान पाहायला मिळालं. त्याच्या आवारात नंदी आणि काही मोठाले गोल गरगरीत गोटे आढळले. ते एखाद्या लढाईत बालेकिल्ल्यावरून सोडून दिलेले असावेत असं वाटलं. मंदिराच्या आवारात मात्र एक तोफ आणि खूप साऱ्या वीरगळी बघायला मिळाल्या. काही वीरगळी चारही बाजूंनी कोरलेल्या होत्या. त्या वीरांची शौर्यगाथा मनात साठवत महादरवाजापाशी आलो आणि परतीची वाट धरली.

                                                                            वीरगळी

 

Comments

Popular posts from this blog

चला आकाशगंगा टिपुया!

चोंढे घाट ट्रेक

ट्रेकिंग